Astronomy News : ब्रह्मांडाच्या विशाल फाफटपसाऱ्यामध्ये अशा काही घटना घडत असतात की, ज्यामुळे खगोल शास्त्रज्ञदेखील आश्चर्यचकित होतात. कारण ब्रह्मांड हे आजही अनाकलनीय आहे. अशीच एक अनाकलनीय घटना सध्या ब्रह्मांडामध्ये घडत आहे.
ही घटना आपल्या सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबाबत आहे. मंगळ ग्रहाचा स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग ज्याला परिवलन गती असे म्हणतात तो अचानक वाढला आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ असा की मंगळ हा ग्रह अचानक जास्त फिरू लागला आहे.

आपल्या सूर्यमालेतील पृथ्वीसह सर्व ग्रह स्वतःच्या अक्षाभोवती फिरताना सूर्याची प्रदक्षिणा करत असतात. प्रत्येक ग्रहाची स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची गती वेगवेगळी आहे. मंगळ ग्रहावर एक दिवस हा २४ तास ३४ मिनिटांचा असतो. मात्र, नव्या संशोधनातून मंगळावर दिवस लहान होत असल्याची बाब लक्षात आली आहे. याचा अर्थ मंगळाची आपल्या अक्षाभोवती फिरण्याची गती वाढली आहे.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या इनसाईट मार्सलँडर मोहिमेतून ही माहिती समोर आली आहे. मार्स लँडरने मंगळ ग्रहाचा आपल्या अक्षाभोवती फिरण्याचा अचूक वेग टिपला आहे. त्यानुसार मंगळाची वाढलेली गती एका मंगळ वर्षामध्ये एक मिलीसेकंद अंशाच्या बरोबरीची आहे.
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनुसार ही आकडेवारी इनसाईट मार्स लँडरवर लावण्यात आलेल्या रेडियो ट्रान्सपॉंडर आणि अँटीनामुळे मिळू शकली आहे. वैज्ञानिक भाषेमध्ये या कृतीला ‘रोटेशन अँड इंटीरियर स्ट्रक्चर एक्सपेरिमेंट’ असे म्हटले जाते. मंगळाचा अक्षाभोवती फिरण्याचा वेग का वाढला आहे याचे आकलन मात्र वैज्ञानिकांना झालेले नाही.