Ahmednagar Loksabha Elections : काँग्रेसच ठरलं ! ह्या मतदारसंघात लढवणार निवडणूक…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Loksabha Elections

Ahmednagar Loksabha Elections : शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या आणि दक्षिणेतून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी द्या, अशी मागणी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे केली.

हंडोरे यांच्या उपस्थितीत रविवारी संगमनेर व नगर शहरात दोन्ही लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, पक्षाचे प्रदेश सचिव सचिन जाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, महासचिव वीरेंद्र किराड, युवकचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाबळे, ज्ञानदेव वाफारे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे यांच्यासह दक्षिणेतील पदाधिकारी उपस्थित होते.

नगर येथील बैठकीत बोलताना आ. कानडे म्हणाले, काँग्रेसची ही सुवर्णभूमी आहे. ज्यांना पन्नास वर्षे काँग्रेसने सर्व दिले त्यांनीच ताटात छेद दिला. बाळासाहेब थोरात यांनी या जिल्ह्यात काँग्रेसला संभाळले. अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. आता लोकसभेला जिद्दीने उभे राहण्याचा मानस कॉंग्रेसने केला आहे. म्हणून दोन्ही मतदारसंघ काँग्रेसने घ्यावे.

किरण काळे म्हणाले, दक्षिणेतून पक्षाचा उमेदवार शतप्रतिशत निवडून येऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या १८ लोकसभा निवडणुकांपैकी बारावेळा येथून काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघ व लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेऊन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी करावी.

यावेळी पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजी भोसले, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजी ढोकले, पाथर्डी तालुकाध्यक्ष नासीरभाई शेख, युवकचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाबळे यांनी भूमिका मांडून मतदारसंघ पक्षाकडे घेण्याची मागणी केली. बैठकीचे संयोजन प्रदेश सचिव गुंजाळ व गुंदेचा यांनी केले.

तांबे यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी प्रस्ताव

पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोनातून संगमनेर येथे आढावा बैठकीत चर्चा झाली. तसेच नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि पक्षापासून दुरावलेल्या पुन्हा संधी प्राप्त करून देणे. यावरही बैठकीत उहापोह झाला. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रस्ताव आढावा बैठकीत मांडण्यात आला. त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला.

आपण ‘दक्षिण’ जिंकू : राजेंद्र नागवडे

जे गणेश कारखान्यात झाले तेच आता दक्षिणेत होणार. जेव्हा थोरात विखे पाटील संघर्ष झाला तेव्हा विखेंना थोरात यांनी धोबीपछाड़ दिली आहे. ज्येष्ठ नेते थोरात यांची अत्यंत चांगली प्रतिमा आहे. संगमनेरचा झालेला विकास, प्रामाणिक भूमिका आणि गटतट न करता जिल्ह्यातील सर्व नेत्यांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. महाविकास आघाडीला असलेले जनसमर्थन त्यांची प्रतिमा या बळावर आपण दक्षिण जिंकू, असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी बैठकीत व्यक्त केला.

दोन्ही जागांसाठी मित्र पक्षांशी बोलणार

बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना हंडोरे म्हणाले, दक्षिणेची जागा काँग्रेसने लढावी, असा पदाधिकारी, कार्यकत्यांचा आग्रह आहे. ही भूमिका मी पक्षाच्या कोर समितीसमोर मांडेल. राज्याचे नेते आणि माझे सहकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसला घेण्यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरु, त्यासाठी मित्रपक्षांशीही आम्ही चर्चा करू, त्यांना समजावून सांगू, तसेच दोन्ही मतदारसंघ घेण्यासाठी मी आग्रही राहील. मात्र, दक्षिणेतून थोरात निवडणूक लढण्यास तयारी नसतील तर मग काय, त्यामुळे याबाबत थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe