Ahmednagar News : बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची परस्पर विक्री करण्या प्रकरणी पाथर्डीत आठ दिवसांत तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून एक अनोळखी व्यक्ती,
हंडाळवाडी येथील आशा भापकर, सचिन काते ( सामनगाव), गणेश काळे (जेऊर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील सोमनाथ बोरुडे यांची आत्या मथाबाई विठोबा बोरुडे ह्या १९९८ साली पैठण येथे मयत झालेल्या आहेत. मयत मथाबाई बोरुडे यांच्या जागी कुणीतरी बनावट महिला उभी करून मे २०२३ मध्ये ही जमीन आशा महादेव भापकर यांच्या नावावर खरेदी दिलेली आहे.
सचिन काते व गणेश काळे त्याला साक्षीदार आहेत, त्यामुळे ही व्यक्ती शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस तपासात अनेक गोष्टी समोर येतील. येथील दुय्यम निबंधक अनिल रामसिंग जव्हेरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बनावट दस्तएवज तयार करून ते खरे आहेत, असे भासवून फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आशा महादेव भापकर, रा. हंडाळवाडी, ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, सचिन साहेबराव काते, रा. सामनगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर, गणेश संजय काळे, रा. बहिरवाडी, जेऊर, ता. जि. अहमदनगर व दोन अनोळखी इसम या सर्वांनी मिळून हा गुन्हा केला आहे.
दरम्यान, बनवाट दस्तऐवज तयार करून जमिनीची परस्पर विक्री करणारी टोळी शहरात कार्यरत आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार रेकॉर्डवर दिसत नाही. त्याचे प्यादे रेकॉर्डवर आहेत. त्यांनी त्याचे नाव घेतल्यास मोठी टोळी उघड होईल. त्यांनी शहरातील गरिबांच्या जमिनी परस्पर विक्री केल्याने अनेकजण रस्त्यावर आलेले आहेत. पोलिसांची भूमिका स्पष्ट होईल, तेव्हा खरे सत्य जनतेसमोर येईल.