Ahmednagar News : राहुरी शहर शिंदे- फडणवीस पवार राज्याच्या विकासासाठी एकत्र येऊ शकतात, त्याप्रमाणे तालुक्यातील विखे, तनपुरे, कर्डिले, कदम यांनीही एकत्र येऊन कर्जाच्या थकबाकीसाठी जिल्हा बँकेने जप्त केलेला डॉ तनपुरे साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, असे आवाहन कारखाना बचाव समितीचे अमृत धुमाळ अरुण कडू व पंढरीनाथ पवार यांनी केले आहे.
धुमाळ, कडू व पवार यांनी राहुरीत याबाबत पत्रकार परीषद घेतली. यात ते बोलत होते. त्यांनी सांगितल की तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे कारखान्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कारखान्याकडे असलेले कर्ज न फेडल्याने जिल्हा बँकेने कारखान्यावर सरफेस अक्टखाली कारवाई करून तो जप्त केला आहे.
ही कारवाई केवळ राजकीय द्वेषातून झालेली असल्याने कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कारखान्याला गत वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर तालुक्यातील नेते मंडळींनी आपापसातील मतभेद बाजुला ठेवून एकत्र आले पाहिजे.
यात माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम,खासदार डॉ. सुजय विखे पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे या सर्वांनी कारखाना वाचविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
कारखानावर करण्यात आलेली कारवाई मागे घेऊन, कारखान्याला जिल्हा बँकेकडून कर्ज देऊन तो सुरु करावा व कर्जाचे १५ वर्षाचे हप्ते पाडून ते वसूल करावे. कारखाना भाडे पट्ट्यावर चालविण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे, तो थांबवून कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, अशी आमच्यासह सर्वांची इच्छा आहे.
कारखाना सात वर्षांपासून खासदार ‘डॉ विखे व शिवाजी कर्डीले यांच्या ताब्यात होता. कर्डिले आता जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. ते खासदार डॉ. विखेंचे निश्चित ऐकतील. त्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यासाठी बँकेकडून २५ कोटींचे कर्ज घेऊन कारखाना सुरु करावा व या कर्जासह मागील थकीत कर्जाचे १५ वर्षांचे हप्ते पाडावे, असे आवाहन धुमाळ, कडू पवार व राजेंद्र शेटे यांनी केले आहे.