नगरच्या पंपींग स्टेशन रस्त्यावर बिबट्याचा संचार

Published on -

Ahmednagar News : येथील बालिकाश्रम परिसरातील पंपींग स्टेशन रस्त्यावर गुरुवारी (दि. १७) रात्री विट्याचा संचार असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. चक्क नगर शहरानजीक बिबट्याचे दर्शन झाल्याने नगरकरांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

तोफखाना पोलिसांनी परिसरात गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. दरम्यान नगर शहरापासून केवळ दहा किलोमिटर अंतरावर असणाऱ्या सोनेवाडी (ता. नगर) या गावात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. गुरुवारी (दि.१७) एका शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला. सध्या गावात बिबट्याची दहशत सुरू आहे.

जंगल सोडून मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याने सध्या अहमदनगर शहर परिसर आणि नगर तालुक्यात धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास) या गावात गेल्या पाच ते सहा महिन्यापासुन मादी जातीच्या बिबट्याचा संचार आहे. विशेष म्हणजे बिबट्या सोबत त्याचे दोन पिले ही आहेत. गावातील विविध वस्तींमध्ये या बिबट्याचे दर्शन होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास नगर सोनेवाडी परिसरात बिबट्याने अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे चालक किरण भुजबळ यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. डॉ. बोरगे यांचा चालक शेतीची मशागत करत होता. अचानक ट्रॅक्टरसमोर मादी बिबट्या आला. ट्रॅक्टरच्या आवाजानं बिथरला. विवट्या हल्ला करणार इतक्यात ड्रायव्हरने प्रसंगावधान ओळखून ट्रॅक्टर जोरात मागे घेतला आणि मागच्या मागे पळून जात स्वतःचा जीव वाचवला. क्षणाचाही उशीर झाला असता तर चालकाचा जीव धोक्यात आला असता. मात्र सुदैवाने यामध्ये काहीही दुर्घटना घडली नाही.

नगर शहराजवळ असलेल्या सोनेवाडी परिसरात हा बिबट्याचा हा थरार अनेक नागरिकांना पाहायला मिळाला. हा मादी बिबट्या त्याच्या पिल्लांसह या भागात अनेक दिवसांपासून राहत आहे. वनविभागाला स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासंदर्भात अनेक वेळ विनंती केली. यानुसार वन विभागाने परिसराची पाहणी करून बिबट्याचा संचार असलेल्या भागात पिंजरे लावले. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आले नाही.

बिबट्याचा पिंजऱ्याला चकवा

सोनेवाडी भागात वनविभागाने बिबट्यासाठी पिंजरा लावलेला आहे. मात्र त्या पिंजऱ्यात बिबट्या जात नाही. विशेष म्हणजे बिबट्याच्या शिकारीसाठी एक शेळीदेखील ठेवण्यात आलेली आहे. मात्र तरीदेखील विबधा पिंजऱ्यात गेला नाही. मात्र सोनेवाडी परिसरात ट्रॅक्टरसमोर अचानक बिबट्या आला. बिबट्या वारंवार पिंजऱ्याला चकवा देण्यात यशस्वी होत आहे.

सोनेवाडी गावात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासुन मावी जातीच्या बिबट्या व तिच्या दोन पिलांचे गावकऱ्यांना दर्शन होत आहे. मोढवे शिवारात बिबट्याची दहशत जास्त आहे. वन विभागाचे प्रयत्न यशस्वी होत नाही. यामुळे गावात घबराटीचे वातावरण आहे. सुरेश सुबे (अध्यक्ष, नगर तालुका खरेदी-विक्री संघ)

सोनेवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. याबाबत वन विभागाने तातडीने उपाययोजना करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा. डॉ. अनिल बोरगे, मनपा आरोग्य अधिकारी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe