MSRTC News : वाहक जाणार संपावर ! प्रवाशांना होणार त्रास

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

MSRTC News : पगारवाढीबरोबरच इतर मागण्यांसाठी ठाणे परिवहन सेवेच्या धर्मवीर आनंद दिघे आगारात कार्यरत असलेले कंत्राटी पुरुष व महिला वाहक हे येत्या २१ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे या संपाचा फटका ठाणेकर परिवहनच्या प्रवाशांना सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.

बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार पुकारले होते, त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेचे कंत्राटी वाहक देखील आक्रमक झाले आहेत.

या बेमुदत संपात १२० महिला आणि २८० पुरुष असे ४०० हून अधिक वाहक सहभागी होणार आहेत. परंतु ते संपात सहभागी झाले तर त्यांना सहकार्य करण्यासाठी कदाचित चालक देखील सहभागी होऊ शकतात, अशी भीती परिवहन सेवेला आहे.

या संपाचा फटका परिवहनच्या प्रवाशांना बसू नये यासाठी परिवहनने पावले उचलली आहेत. जीसीसी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आनंद नगर डेपोमध्ये देखील या संपाची झळ बसू शकते. त्यामुळे जे वाहक, चालक संपात सहभागी होतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा येथील ठेकेदाराने केला आहे.

तसेच प्रवाशांना फटका बसू नये यासाठी परिवहनमधील कायमस्वरूपी सेवेत असलेले वाहक या काळात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. परिवहनच्या पहिल्या स्थानकावर आणि शेवटच्या स्थानकावर तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत.

दरम्यान, परिवहन प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संप संपुष्टात येत नाही, तोपर्यंत साप्ताहिक सुट्ट्या व इतर सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांच्या आगाऊ रजा मंजूर असतील अशा कर्मचाऱ्यांनी रजा न घेता नियोजित कर्तव्यावर हजर राहावे, कोणीही कर्मचारी विनापरवानगी, विनासंमती कर्तव्यावर गैरहजर राहतील, अशा कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर केल्या जाणार नाहीत. तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा एका पत्रकाद्वारे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe