Onion News : केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी सुरू झाली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली.
केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांच्या शासकीय निवासस्थानी कृषीमंत्री मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी आमदार अतुल बेनके हेही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुंडे म्हणाले, राज्यातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक कांदादेखील खरेदी केला जाईल.

या खरेदीची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यानंतर कांद्याचे बाजारभाव कमी होतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल, ते होऊ नये यासाठी कृषीमंत्री मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेतली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नाफेड आणि एनसीसीएफमार्फत राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाईल, असे ठरले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. विषयाची संवेदनशीलता बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही केंद्रीय मंत्री गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रतिक्विंटल २४१० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील. शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुंडे यांनी यावेळी दिली.
जाहीर केलेला दर समाधानकारक असून शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदाविक्री करावी, अशी विनंतीही शेतकऱ्यांना मुंडे यांनी यावेळी माध्यमांच्या माध्यमातून केली. केंद्र सरकारने निर्यातशुल्काबाबत पुनर्विचार करावा,
अशी मागणी राज्य शासनाकडून करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तत्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगून त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
केंद्राने संभ्रम दूर केला – देवेंद्र फडणवीस
कांदा उत्पादकांसंदर्भात केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून २ लाख टन कांदा प्रतिक्विंटल २,४१० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय तातडीने घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे अतिशय मनापासून आभार मानतो.
निर्यातीवर शुल्क लावल्यामुळे महाराष्ट्रासारख्या कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कांद्यांचे भाव कमी होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र सरकार कांदा खरेदी करणार असल्याने कांदा उत्पादकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचे काम आज केंद्र सरकारने केले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान येथून दिली आहे.