India News : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण गाजत असताना, आता एक बांगलादेशी महिला आपल्या कथित नवऱ्यासाठी भारतात आल्याचे समोर आले आहे.
सोनिया अख्तर नामक या महिलेने नोएडातील सौरवकांत तिवारीनामक व्यक्तीसोबत आपला निकाह झाल्याचा आणि त्याच्यापासून एक मूल झाल्याचा दावा केला आहे. लग्नानंतर तिवारी भारतात पळून आल्याचा तिचा आरोप आहे. तिच्या या तक्रारीची देखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बांगलादेशी सोनिया पर्यटन व्हिसावर भारतात आली आहे. सोनियाच्या तक्रारीवरून नोएडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. महिलेने आपला व मुलाचा पासपोर्ट, व्हिसा आणि बांगलादेशी नागरिकत्व कार्डची माहिती आम्हाला दिली असल्याचे अतिरिक्त डीसीपी (मध्य नोएडा) राजीव दीक्षित यांनी सांगितले.
प्राथमिकदृष्ट्या सोनिया व सौरभकांतने विवाह केल्याचे दिसून येत आहे. पण तरीही सखोल चौकशीसाठी हे प्रकरण महिला व बाल सुरक्षेशी संबंधित एसीपीकडे सोपविण्यात आल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. तिवारीने ४ जानेवारी २०१७ ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यान ढाकातील खासगी कंपनीत काम केले होते.
विवाहित असताना देखील त्याने बांगलादेशमधील वास्तव्यादरम्यान इस्लामिक पद्धतीने सोनियासोबत निकाह केला. तिवारीला पहिल्या पत्नीपासून दोन अपत्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमाच्या नावाखाली भारतात अवैध घुसखोरी करणाऱ्या सीमा हैदरच्या प्रकरणावरून चांगलाच गाजावाजा झालेला असताना हे प्रकरण समोर आले आहे.
नोएडातील सुरजापूर भागात राहणाऱ्या सौरभकांत तिवारीने जवळपास तीन वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये असताना माझ्यासोबत निकाह केला होता. यांनतर आम्हाला मुलगाही झाला. पण नंतर तिवारी पळून भारतात आला. तिवारी अगोदरच विवाहित असून, आता तो मला स्वीकारण्यास तयार नाही. माझ्या मुलासह त्याच्यासोबत संसार करायचा आहे. – सोनिया अख्तर