Onion News : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर ४०% अधिकची शुल्क वाढ केली व परिणामी कांदा निर्यात बंद झाल्याने कांद्याचे भाव अचानक प्रति किलो १० ते १२ रुपये घटले व त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यापारी सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे गळ्यात कांद्याच्या माळा घालून निषेध व्यक्त करत निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत दीपक गुगळे, अमित गांधी, शहानवाज शेख, संतोष डमाळे, किरण गाढवे, शेखर पंचमुख, योगेश भालेराव, रमेश खैरे आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक महिन्यापासून शेतकरी कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करत होता. त्यावेळी शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील कांदा विकून निघत नसल्याने त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती.
परंतु त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. उलट मागील ३ महिन्यापूर्वी केंद्र शासनाने कांद्याला ३.५ रुपये किलो अनुदान घोषित केले होते. ते सुद्धा किचकट आणि ऑनलाईनच्या नियमांमध्ये बांधले गेले असल्याने कित्येक शेतकरी त्या अनुदानापासून आजही वंचित आहेत.
मागील पाच दिवसापासून कांद्याला २५ ते ३० रुपये किलो भाव आल्याने अनेक महिन्यापासून कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना २ रुपये नफा मिळत होता. परंतु महागाई कमी करण्याच्या नादात सरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने याचा जाहीर निषेध जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने नोंदविण्यात आला असल्याचे म्हटले आहे.