Maharashtra News : महामार्गांवरील टोलनाक्यावर प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. २१ रोजी नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा टोलनाका बंद पाडला.
या वेळी टोलनाका व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी मनसेच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापनाची भेट घेऊन महामार्गावरील असुविधांबाबत जाब विचारून प्रत्यक्ष पाहाणी केली असता, स्वच्छतागृहात दुर्गंधी आढळली.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-08-23T104619.548.jpg)
नगर-पुणे महामार्गावर फक्त पुरुषांसाठी एक टॉयलेट असून, तेही दुर्गंधीयुक्त आढळले. महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह दुर्गंधी युक्त आढळले तसेच पार्किंगची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. या वेळी महामार्गावर घडणारे अपघात, अपूर्ण व निकृष्ठ दर्जाच्या कामाचा जाहीर निषेध करत म्हसणे फाटा टोलनाका बंद पाडण्यात आला.
पोलिस प्रशासनासह टोलनाका व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत तीन दिवसांच्या आत मूलभूत सुविधा, सुपा विश्रामगृह ते मुख्या चौकात डिव्हाडर बसवणे तसेच तुटलेल्या डिव्हाडरची दुरुस्ती करणे संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करणे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे लेखी आश्वासन टोल व्यवस्थापनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात मनसे माथाडी कामगार सेना नेते अविनाश पवार, पारनेर तालुका उपाध्यक्ष रवी रासकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, वाहतुक सेनेचे बंडू बनकर, राहुरी शहराध्यक्ष दादा काळे, आदी सहभागी झाले होते.