Ahmednagar News : पारनेर तालुक्यात धुमाकूळ घालणारी दरोडेखोरांची टोळीला पकडण्यात पारनेर पोलिसांना यश आले असून, या टोळीकडून पोलिसांनी तीन लाखांचे दागिने हस्तगत केले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारः दि. २७ जुलै २३ रोजी जवळा गावातील एका दाम्पत्याला चोरट्यांनी मारहाण करून घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचा ऐवज लुटून नेला होता.
याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा सुरेगाव, ता. श्रीगोंदा व परिसरातील चोरट्यांनी केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली.
त्यानुसार त्यांनी चोरटयांना जेरबंद करण्यासाठी शोध पथक रवाना केले. पोलीसांनी वेशांतर करून सदर आरोपींचा पाठलाग करून मिथुन उंबऱ्या काळे (वय २२), रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, आजय शादिश काळे (वय २२),, रा. वाळुंज, ता. नगर व नागेश विक्रम भोसले (वय २०), रा. घोसपुरी ता. नगर, यांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीसांनी त्यांना पोलीस खाक्या दाखवताच पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी, घरफोडी, जबरी चोरी व दरोडा, अशा एकूण १२ गुन्ह्यांची कबुली दिली तसेच गुन्ह्यातील चोरलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी एकूण ३ लाख ५ हजार ८५० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुद्देमाल काढून दिला आहे.