India News : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीच्या बळावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- 3 चे यशस्वी लँडिंग झाले आहे. इस्रो या संस्थेचे हे यश व या अभियानातील सर्व शास्त्रज्ञांचा तमाम देशवासीयांसाठी अत्यंत अभिमान असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
चंद्रयान -3 च्या यशस्वीतेबद्दल दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार थोरात म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इस्रो या संस्थेची स्थापना केली. स्व. इंदिरा गांधी यांनी अंतरात अंतराळवीर पाठविले. कॅप्टन राकेश शर्मा यांच्याशी झालेल्या त्यांचा संवाद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहे.

स्व. राजीव गांधी यांनीही या संस्थेला दिशा देण्याचे काम केले. नरसिंहराव यांच्या काळातही या संस्थेने आपली यशस्वी वाटचाल सुरूच ठेवली. आजच्या यशाची पायाभरणी ही केलेल्या या नेतृत्वाचे व संशोधकांचे आजच्या यशात मोठे योगदान आहे.
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष चंद्रयान- 3 च्या मोहिमेकडे लागले होते. 14 ते 23 ऑगस्ट हा चंद्रयानाचा यशस्वी प्रवास राहिला आहे. इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर आजचा हा सुवर्ण दिन देशवासीयांसाठी उगवला आहे.
हा ऐतिहासिक दिन असून प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश असून दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
या अभिमानास्पद कामगिरीमुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतराळात संशोधनास यामुळे शास्त्रज्ञांना अधिक उत्साह आणि ऊर्जा मिळाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या पायाभरणीपासून योगदान देणाऱ्या सर्व नेतृत्वांचे व सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करत असल्याचेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.