गद्दारांच्या पराभवाची तयारी करा ! संभाजीनगर, बीड, वाशिम, चंद्रपूर, लोकसभा मतदारसंघांचा आढावा

Ahmednagarlive24 office
Published:
udhav thakrey

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत (ठाकरे) गद्दारी करणाऱ्यांच्या पराभवाची तयारी करा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गुरुवारी वाशिम, चंद्रपूर, संभाजीनगर आणि बीड या चार लोकसभा मतदारसंघांचा ‘मातोश्री’ निवासस्थानी आढावा घेताना ठाकरे यांनी या सूचना दिल्या. मतदारसंघातील प्रत्येकी तीस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ४८ लोकसभा मतदारसंघांतील आपल्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

पक्षातील फुटीचा सेनेच्या मतदारसंघावर किती प्रभाव पडला आहे. पक्षाची ताकद कमी झाली आहे का, याबाबत वाशिम, चंद्रपूर, संभाजीनगर आणि बीड या चार लोकसभा मतदारसंघांचा ठाकरेंनी गुरुवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस हे तीन पक्ष आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. परंतु सेनेचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांवर ठाकरेंकडून दावा केला जाणार आहे. सेनेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांत पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना ठाकरेंनी दिल्या.

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या फुटीर गद्दारांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी खासदार भावना गवळी आणि मंत्री तथा शिंदे गटाचे आमदार संजय राठोड ठाकरेंच्या निशाण्यावर होते. कोणत्याही स्थितीत हे दोन्ही मतदारसंघ ताब्यात यायला हवेत, असे निर्देश कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe