Maharashtra News : एक सप्टेंबरपासून १०८ रुग्णवाहिका सेवा होणार बंद ? बीव्हीजी कंपनीकडून चालकांचे शोषण !

Ahilyanagarlive24 office
Published:

राज्यात २०१४ पासून रुग्णांसाठी मोफत १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेवरील चालकांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी एक सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील चालक संपात सहभागी होणार आहेत. नगर जिल्हा तसेच तालुक्यातील चालकांनी देखील काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

निवेदनामध्ये बीव्हीजी कंपनीने दिलेले आश्वासन पाळले नाही. १०८ रुग्णवाहिकेवर चालक नियुक्त करण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आलेली आहे. चालकांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर राबवून घेतले जात आहे.

आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर बीव्हीजी कंपनीकडून दिलेले आश्वासन पाळण्यात आले नाही. तामिळनाडू व कर्नाटक राज्यातील रुग्णवाहिका चालकांना मिळणाऱ्या वेतनाच्या अर्धेच वेतन देऊन बीव्हीजी कंपनी चालकांचे शोषण करत आहे.

कंपनीशी पत्रव्यवहार करून देखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना निवेदन देऊन मागण्यांबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

ऑगस्ट अखेर निर्णय घेतला गेला नाही तर एक सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक, तामिळनाडू राज्यात चालकांना आठ तासासाठी तीस हजार रुपये तर बारा तासांसाठी ३८ हजार रुपये वेतन देण्यात येते.

परंतु महाराष्ट्र राज्यात बारा तासांसाठी १६ ते १९ हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद व आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe