Farming News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव व परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके अखेरची घटका मोजत असून, जोरदार पाऊस न झाल्यास पिके हातातून जाणार आहेत.
सध्या बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दुसरीकडे विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचे संकट सध्या बिकट बनत चालले आहे. परिसरात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
ढोरजळगाव परिसरात कपाशीची लागवड केल्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने पिके करपू लागल्यामुळे परिसरातील गतवर्षी कापसाला भाव हजारो एकर क्षेत्रावरील पिके पावसाअभावी धोक्यात सापडली आहेत. सध्या तरी बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहे. बरस रे वरुणराजा किती अंत पाहतो, अशी आर्तहाक शेतकरी राजा देत असल्याचे चित्र आहे.
ढोरजळगाव मंडळातील बहुतांश गावांत कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, पावसाळ्यातील सव्वादोन महिने उलटले तरीही परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाअभावी कपाशीसह इतर पिकाची वाढ खुंटली आहे.मोठा पाऊस न झाल्याने ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहिलेल्या नाहीत. विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावलेली आहे.
शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून पिके जोपासली आहेत; परंतू गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने कपाशी, सोयाबीन, तूर व ऊस पिकाची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान होणार आहे. काही शेतकऱ्यांकडे विहीर, बोरवेलच्या पाण्याची व्यवस्था आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचा ऊस मुळा पाटबंधारेच्या पाण्यावर अवलंबून आहे.
त्यात मुळा धरणातून पाणी न सुटल्याने हातातोंडाशी आलेले पिके जळून जात आहेत. दरम्यान, यंदा जोरदार पाऊस पडत नसल्याने पिकांची वाढ खुंटून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. सद्यस्थितीत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
गतवर्षी कापसाला भाव मिळाला नाही. यावर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, आतापर्यंत पाऊसही कमी प्रमाणात पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. देवीदास खोसे (शेतकरी)