Ahmednagar News : सन २०२२ च्या अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या चुकीच्या याद्या करण्यात आलेल्या आहेत, त्या दुरुस्त करून अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशा आशयाचे निवेदन जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हसनापूर, वरखेड येथील शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना शेवगाव येथे दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सन २०२२ चे अतिवृष्टीचे अनुदान सरसकटपणे देण्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आधार नंबर, बँक खाते नंबरसह याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. परंतु या याद्यांमध्ये शासकीय अधिकारी, महसूल कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुकांमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असून, त्यांना याचा आर्थिक फटकादेखील सहन करावा लागत आहे.
याद्या करताना अधिकाऱ्यांकडून चुकीचे आधार नंबर टाकल्यामुळेदेखील अनेक शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सबब मूळ आधार नंबर व बँक खाते नंबर हे तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. आपल्याच शासकीय यंत्रणेकडून चुकीची बँक माहिती व आधार लिहिण्यात आल्याने इन्व्हॅलीड आधार, असा शेरा दिसत आहे.
याद्यांचा अभ्यास करताना असे निदर्शनास आले की, एकच आधार नंबर दोन-दोन शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.अनुदान नाकारण्याच्या कारणापुढे मल्टीपल नेम अगेस्ट सेम आधार असे लिहिलेले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांची कुठलीही चूक नाही. तथापि असे न घडता एकच आधार नंबर तलाठी व संबंधित अधिकारी यांनी दोन ठिकाणी टाकलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नाही. पर्यायाने दोनही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. ही अत्यंत गंभीर चूक आहे.
तर काहींच्या नोंदी अचूक असूनही त्यांच्या नावावर अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही. अशाच प्रकारच्या इतरही चुका आपल्या खात्याकडून झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आपल्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
संबंधित तलाठयांना त्यांच्या कार्यालयातच अनुदान याद्या दुरस्त करण्याबाबत आदेश द्यावेत. ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी अचूक असूनही अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने अनुदान वर्ग करावे. अन्यथा जनशक्ती आंदोलन हाती घेईल.