Crop Insurance : खरीप हंगाम वाया गेला असल्यामुळे विमा कंपनीकडून २५% नुकसान भरपाईची रक्कम अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंडळातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यानी केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नाही. तरीही पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, तूर, उडीद, मका, कांदा इत्यादी पिकांची पेरणी केली.
ही पिके सर्वत्र कमी अधिक प्रमाणात उगवली तर काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळही आली. खरीप हंगामामध्ये हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या नत्रामुळे पिकांचा हिरवेपणा टिकून राहिला आहे. मात्र पिकांची वाढ खुंटलेली आहे.
सध्या खरीप हंगामाची अडीच महिने संपून गेली असल्यामुळे पिके फुलोऱ्यात येत नाहीत तसेच काही फुले आली तरी ती गळून जात आहेत. अशा परिस्थितीसाठी शासनाने एक रुपयांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ दिवस पावसाचा खंड असल्यास पिकांची नुकसानभरपाई म्हणुन २५% रक्कम शेतकऱ्यांना तातडीने दिली जाते.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये २५% रक्कम देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील फक्त तीन मंडळे पात्र झाली आहेत. मात्र कोपरगावसह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या निकषानुसार २५% रक्कम द्यावी, अशी मागणी भारतीय जनसंसचे राज्य अध्यक्ष अशोक सगब्बन, वीर बहादुर प्रजापती, भगवान जगताप, सुनील टाक व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.