Ahmednagar Crime : क्रिकेट सद्वयात पैसे हरल्यानंतर ते परत करण्यासाठी सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने घुसून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. टिळक रोडवरील शिंगवी ज्वेलर्समध्ये २२ ऑगस्ट रोजी दागिने खरेदीसाठी आलेल्या एकाने हातचलाखीने २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केली होती.
कोतवाली पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ५६ हजार ५५० रु किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. कामरान सिराज शेख (वय ३६, रा. हाजी सुलेमान बिल्डींग, माळीवाडा, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
टिळक रोडवरील शिंगवी ज्वेलर्स येथे आरोपी कामरान शेख हा दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. दागिने पाहत असतानाच सुमारे २५ ग्रॅम वजनाचे दागिने हातचलाखीने चोरी केले होते.
दागिने चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर शिंगवी ज्वेलर्सचे विशाल नितीन शिंगवी (वय ३०, रा. पटेलवाडी, टिळकरोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की चोरी करणारा आरोपी कामरान शेख हा माळीवाड्यातील त्याच्या घराजवळ येणार आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता शेख याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमात जप्त करण्यात आला आहे. अधिक चौकशीत सदर आरोपीने ऑनलाइन क्रिकेट सट्टा पुणे येथे खेळत होतो. मोठ्या प्रमाणावर पैसे हरलो होतो ते पैसे देण्यासाठी चोरी केल्याचे आरोपीने कबूल केले.