Maharashtra News : महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. 125 वर्षात जे घडलं नव्हतं ते यंदा घडल आहे. तब्बल सव्वाशे वर्षानंतर महाराष्ट्रात प्रथमच ऑगस्ट महिन्यात 21 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड राहिला आहे. सध्या राज्यात भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याचे चित्र आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंतेचे मलभ पसरलेले आहे. शेतकऱ्यांसहित महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता देखील राज्यात मुसळधार पाऊस पडत नसल्याने चिंतेत आली आहे. संपूर्ण राज्यावर चिंतेचे ढग आहेत. जर आगामी काही दिवसात राज्यात मोठा पाऊस पडला नाही तर खरीप हंगामातील पिके तर वाया जातीलच शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची दाट शक्यता तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-शिंदे-सरकारचा-निर्णय.jpg)
यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील उपस्थित होणार आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ लोकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान खरीप हंगामातील पिकांसाठी शासनाने तात्काळ कृत्रिम पाऊस पडावा अशी देखील मागणी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुढे येत आहे. अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
शिंदे सरकारने गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 1,500 कोटी रुपयांपैकी 210 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या खरीप हंगामात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते.
यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती. मात्र अनुदानाची ही रक्कम राज्य शासनाने मंजूर केली खरी परंतु नवीन खरीप हंगाम सुरू झाला तरी देखील याचा लाभ कोणत्याच शेतकऱ्याला मिळाला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांकडून संबंधित नुकसान भरपाई लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशी मागणी जोर धरत होती. शिवाय शासनाविरोधात संबंधितांचा रोष देखील वाढत होता. अशातच काल अर्थातच 28 ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने मंजूर झालेल्या 1500 कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे.
त्यामुळे दुष्काळाचा उंबरठ्यावर उभ्या महाराष्ट्रातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे. हा निधी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संगणकीय प्रणाली वरून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात काल वर्ग झाला आहे. आता हा निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे पुढल्या शुक्रवार पर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 178 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान हा निधी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे त्यांच्याच खात्यात वर्ग होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.