Rakshabandhan : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण बुधवारी (दि. ३०) साजरा होणार आहे. हिंदू धर्मात बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात.
अत्यंत प्रेमाचा विश्वासाचा आणि आपुलकीचा असा हा क्षण असतो. बुधवारी भद्रा काळ असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून रक्षाबंधन साजरा करावा, असे आवाहन पंचांगकत्यांनी केले आहे.
पंचांगानुसार भद्राची उपस्थिती सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत असल्याने दिवसभर राखी बांधता येणार नाही, अशा अफवा समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहे.
दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या काळात भद्रा काळ येतच असतो. पूर्वी समाजमाध्यमे नसल्यामुळे अशा अफवा पसरविल्या जात नव्हत्या. रक्षा बंधन या पवित्र सणाला भद्रा काळाचा अडसर येणार नाही, असे पंचांगकत्यांनी स्पष्ट केले आहे.
भद्रा काळाविषयी आख्यायिका
भद्राकाळ हा विनाशकारी काळ मानला जातो. म्हणूनच याला अशुभ म्हटले जाते. भद्रा काळात राखी का बांधू नये, याबाबत आख्यायिका सांगितली जाते.
या आख्यायिकेनुसार त्रेतायुगात रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळात राखी बांधून घेतली होती. यानंतर त्याच्या विनाशाला सुरुवात झाली आणि अखेर प्रभू श्रीरामांनी त्याचा वध केला. यस भन्दा काळात राखी बांधत नाही.