Ahmednagar News : गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील २३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १० हजार शेतकऱ्यांना मदत मिळाली असून अद्यापही १३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आठ दिवसांत या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी,
अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे २३ हजार शेतकऱ्यांना बसला होता. वारंवार पाठपुराव्यानंतर सरकारने अतिवृष्टीग्रस्त २३ हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मात्र, कागदपत्राची पूर्तता करणे, केवायसी व अन्य कारणांमुळे त्यास विलंब झाला होता.
या संदर्भात आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक कानडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेत तहसील कार्यालयात आंदोलन केले होते. त्यानंतर तातडीने सुमारे १५ कोटी रुपयांची मदत तालुक्यासाठी प्राप्त झाली होती.
मात्र, कागदपत्रांची अपूर्तता व केवायसीच्या कारणामुळे केवळ १० हजार शेतकऱ्यांच्याच खात्यात ही रक्कम वर्ग झाली आहे. अद्यापही १३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तसेच भेर्डापूर, पढेगाव, भामाठाण, नायगाव, मालुंजे, खानापूर यांसह आठ गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाला प्राप्त न झाल्यामुळे ही गावे मदतीपासून वंचित राहिली आहेत.
त्यामुळे संबंधित गावातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या याद्या त्वरित महसूल विभागाला द्याव्यात, महसूल विभागांने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
विमा कंपनीची २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी, यासाठी सध्या सर्वे सुरू झाला आहे. मात्र, हा सर्वे करताना ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले आहेत, त्याचीच नोंद होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात कानडे यांनी सर्वेमध्ये सुसूत्रता आणून योग्य लाभार्थ्यांना अग्रीम रक्कम मिळावी, अशी मागणी कानडे यांनी केली आहे.