Ahmednagar Breaking : वाळूतस्करांकडून तलाठ्याला मारहाण; महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ

Published on -

Ahmednagar Breaking : महसूल पथकाने जप्त केलेली वाळू चोरून भरत असताना अचानकपणे तलाठी आणि महसूलचे पथक गेल्याने कारवाई करणाऱ्या महसूलच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केला.

या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाले असून या तस्करांनी वाळू ढंपरही मारहाण करून पळवून नेला. तालुक्यातील भेर्डापूर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भेर्डापूर येथे तीन-चार दिवसांपूर्वी महसूलच्या पथकाने स्मशानभूमीजवळ पकडलेल्या अवैध वाळूचा साठा करून ठेवला होता.

बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, भेर्डापूर येथून चोरून वाळू वाहतूक केली जात आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी बाळासाहेब वायखिंडे, तलाठी शिवाजी दरेकर, तलाठी बाबासाहेब कदम यांचे पथक भेर्डापूरला घटनास्थळी गेले.

त्याठिकाणी एका डंपरमध्ये काही लोक चोरीची वाळू भरत होते. तेव्हा महसूलचे पथक आल्याने वाळू भरणारे त्या ठिकाणाहून पळून गेले. त्यामुळे कारवाईसाठी महसूलच्या या पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून बंदोबस्त मागितला.

पोलीस यायच्या अगोदर या ठिकाणी १५ ते २० जणांचे टोळके आले. या टोळक्याने थेट महसूलच्या पथकावर हल्ला करत मारहाण केली. या मारहाणीत तलाठी शिवाजी दरेकर हे जखमी झाले.

त्यात त्यांचे एक बोट मोडले असून मंडळाधिकारी बाळासाहेब वायखिडे आणि बाबासाहेब कदम हे तलाठी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही या वाळू तस्कराच्या टोळक्यांनी मारहाण केली. मारहाण करत या ठिकाणी पकडलेला हा डंपरही वाळू तस्करांनी पळवून नेला.

त्यानंतर पोलीस आल्यावर तलाठी शिवाजी दरेकर यांना उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधीत वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News