Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील काही दिवस ‘यलो अलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
गेली काही दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. संपूर्ण ऑगस्टमध्ये मोजकेच दिवस पाऊस पडल्याने राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे.
सध्या कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत वायव्य बंगालच्या उपसागरात वाऱ्याची एकचक्रीय स्थिती तयार होण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊन पावसाची शक्यता वाढली आहे.
हवेत पुरेशी आर्द्रता असल्याने काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी (दि. १) मध्य महाराष्ट्रातील लोहगावमध्ये ९ मिमी. इतका पाऊस पडला आहे. कोल्हापूरमध्ये ०.८ मिमी. व महाबळेश्वरमध्ये ०.२ मिमी. तर सातारामध्ये ०.४ मिमी. पावसाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात सायंकाळपर्यंत नोंद झाली नाही.
येत्या २ व ३ सप्टेंबरदरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २ ते ४ सप्टेंबरदरम्यान, तसेच विदर्भात २ ते ५ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याच दरम्यान, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूरमध्ये ३८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वरमध्ये १७.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.