Ahmednagar News : जामखेड नगरपरिषदेचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी शिक्षिका सौ. सुनीता राजेंद्र गायकवाड (वय ४८) यांचे आज सकाळी आष्टी येथील शाळेत शिक्षकदिनाच्या दिवशी शिक्षकदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सौ. सुनीता गायकवाड, या गेल्या वीस वर्षांपासून आष्टी येथील आनिशा ग्लोबल स्कूलमध्ये कार्यरत होत्या. आज दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी त्या शिक्षकदिन असल्याने जामखेडहून आपल्या शाळेवर पोहचल्या.
शाळेत दुपारी शिक्षकदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच चक्कर आल्याने त्या खुर्चीवरून खाली कोसळल्या. त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
शिक्षकदिनाच्या दिवशीच शिक्षिका सौ. सुनीता गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने शिक्षक व मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामागे पती राजेंद्र गायकवाड व दोन मुली, असा परिवार आहे.