Ahmednagar News : सातव्या वेतन आयोगासह १७ प्रलंबित मागण्यांसाठी मनपा कर्मचारी युनियनने मंगळवारी (दि. ५) एक दिवसाचा संप पुकारला होता. मनपाच्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्यामुळे मनपाचे सवं कामकाज ठप्प झाले होते. इतकेच नाही तर शहरात कचरा संकलन न झाल्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले होते.
मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठवडयात मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना भेटून निवेदन दिले होते.
यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह १७ मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांसाठी कामगार युनियनने २ ऑक्टोबरपासून मंत्रालयापर्यंत लॉग मार्च काढण्याचा इशारा दिलेला आहे.
राज्यातील सर्व मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आलेला आहे. मात्र नगर महापालिकेत हा प्रश्न प्रलंबित असून ही मागणी मान्य करण्यात यावी अशी युनियनची भूमिका आहे. कामगारांच्या या संपामुळे मनपात शुकशुकाट पहावयास मिळाला.
मनपात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना संपामुळे माघारी फिरावे लागले. संपामुळे पदाधिकारीही मनपाकडे फिरकले नाहीत, अधिकारीही आपल्या दालनातच बसून होते.
दरम्यान, लाक्षणिक सत्याग्रह करण्याचे जाहीर करून प्रत्यक्षात काम बंद ठेवण्यात आल्याने मनपाच्या कर्मचारी व कामगारांवर मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कारवाई करत अचानक केलेल्या संपात सहभागी झालेल्यांवर बिनपगारी रजेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.