Maharashtra Rain Update : वायव्य आणि पश्चिम बंगालच्या उपसागरावर जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता, त्याचे रूपांतर आता चक्रिय स्थितीत झाले आहे. आता ते वायव्य दिशेला हळूहळू सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
तसेच ८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी वर्तवली आहे.
येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही भागात • मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात ८, ९ आणि १० या तारखेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भ परिसरात १० तारखेनंतर काही भागांत मध्यम तर काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.