राज्यात जोरदार पावसाची हजेरी…! कोकण व मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात आज यलो अलर्ट

Published on -

Maharashtra Rain Alert : राज्यात पाऊस सक्रिय झाला असून विदर्भ, मराठवाडा व कोकणाच्या तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्यात शुक्रवारीही बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. काही भागांत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.

गुरुवारी सायंकाळपर्यंत कोकण भागातील मुंबईत ४४ मिमी, सांताक्रुझ ९३ मिमी इतका पाऊस पडला, तर अलिबाग ९ व रत्नागिरीत ४ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ मिमी, धाराशिव ४, परभणी ०.५,

नांदेड ४ व बीडमध्ये ०.२ मिमी पाऊस पडला. विदर्भातील अमरावतीत २५ मिमी, गोंदिया १६, नागपूर ३० तर वर्ध्यामध्ये ५१ मिमी इतका पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगावमध्ये ४, महाबळेश्वर ११, तर नाशिकमध्ये ०.५ मिमी पाऊस नोंदवला आहे.

घाटमाथ्यावरही पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी यलो अलर्ट असून बहुतांश भागांत पाऊस पडणार आहे. तसेच काही भागांत जोरदार पाऊस पडणार आहे. त्यानंतर ९ ते १३ सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात ८ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट असून येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe