अहमदनगर दौंड रेल्वेमार्गावर चोरट्यांची भलतीच चोरी ! चक्क साखरेचे १२३ पोते चोरले

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर- दौंड कॉर्डलाईन रेल्वे मार्गावर सारोळा कासार (ता. नगर) रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी साखरेची तब्बल १२३ पोती लंपास केली. चोरलेली साखरेची पोती चोरट्यांनी रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतातील मकाच्या पिकात लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी ते हस्तगत केले आहेत.

नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशन जवळ मालगाडीचे डबे फोडून त्यातील मालाच्या चोरीच्या घटना सातत्याने होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमी रेल्वे पोलिस रात्रीच्या वेळी गस्त घालत असतात.

दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि.५) पहाटे अशाच प्रकारे मालगाडीचा एक डबा चोरट्यांनी फोडून त्यातील साखरेची पोती चोरून नेल्याचे निदर्शनास आले होते. गस्त घालणारे हेड कॉन्स्टेबल बापू घोडके आणि सुनील मराठे यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली.

त्यामुळे नगर व दौंड येथून लोहमार्ग पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनीही तेथे धाव घेतली. या चोरीचा तपास करत असताना आणि रेल्वे स्टेशन परिसरात सर्वत्र शोधाशोध करत असताना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे मार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वे परिसराबाहेरील असलेल्या शेतात साखरेची पोती काळ्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेल्या स्थितीत आढळून आली.

पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची मोजणी केली तेव्हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास १२३ साखरेची पोती आढळून आली. पोत्यांवर कृष्णा शुगर, चितळी, जिल्हा बेळगाव असा शिक्का आहे.

ही पोती शेतात कोणी आणून ठेवली याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. १२३ पोत्यांचे साधारणपणे ६१५० किलो वजन असून, याची किंमत एक लाख ९० हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली साखर पोती पोलिसांनी हस्तगत करून गुन्हा नोंद केला. पुढील तपास केला जात आहे.

नगर- दौंड कॉर्डलाईन मार्गावर रेल्वे स्थानक परिसरात मालगाड्या नेहमी क्रॉसिंगसाठी थांबविल्या जातात. मालगाड्या या दुय्यम मार्गावर थांबविलेल्या असल्याने रेल्वे स्थानकावरील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पलीकडच्या बाजूने चोरटे काय करतात याची कुठलीही कल्पना येत नाही.

त्यामुळे चोरट्यांचे फावत असून, या मार्गावर विशेषतः सारोळा कासार परिसरात वारंवार अशा चोऱ्या होत असतात. नेहमीच लाखो रुपयांचा माल चोरीला जात असल्याने रेल्वे पोलिसांनी यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe