Ahmednagar Market : लिंबाचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Market : पावसाने ओढ दिल्याचा फटका लिंबाला बसला आहे. लिंबू उत्पादन भागात पावसाने पाठ फिरविल्याने घटलेली आवक, त्यातच श्रावण महिन्यातील सण-उत्सवामुळे स्थानिक भागातून वाढलेली मागणी आणि परराज्यात होणारी मालाची निर्यात यामुळे लिंबाचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले आहेत.’

गेल्या आठवड्यात ३०० रुपये गोणी असलेले भाव आता दर्जानुसार ४०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात १० रुपयांना ३ लिंबांची विक्री होत आहे. याबाबत लिंबाचे व्यापारी रोहन जाधव म्हणाले की, गुलटेकडी येथील मार्केटयार्डात सोलापूर जिल्हा, राशीन, कर्जतसह नगर जिल्ह्यातून लिंबाची आवक होत असते.

मागील आठवड्यात दीड ते दोन हजार गोणी लिंबाची आवक झाली होती. ती सद्यःस्थितीत ८०० ते ११ हजार गोणी होत आहे. एका गोणीत ३५० ते ४५० लिंबू असतात. उन्हाळ्यात लिंबाचे भाव कडाडले होते.

त्यानंतर सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर काही काळ लिंबाची आवक वाढली होती. तर, अपेक्षित मागणी नसल्यामुळे लिंबाचे भाव घसरले होते. मात्र, आता पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळ पडू लागला आहे. त्याची झळ लिंबाला बसली आहे.

पावसाने हजेरी न लावल्यास लिंबाची आवक घटून भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या स्थानिक भागासह हैदराबाद, राजस्थान आणि दिल्ली येथून लिंबाला मोठी मागणी आहे.

लिंबू उत्पादक भागात पावसाने ओढ दिली आहे. परिणामी, लिंबाची आवक घटली आहे. त्या तुलनेत स्थानिक आणि परराज्यातील बाजारपेठांमधून लिंबाला मागणी आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे. त्यातच येत्या कालावधीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आहे. त्यामुळे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe