Ahmednagar News ; महसूल पथकावर बळजबरी करत वाळूचा ट्रक पळविला ! त्या दहा जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून तो श्रीगोंदा येथे घेऊन जाणाऱ्या शेवगावच्या महसूल पथकावर नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने अडवत पथकाच्या ताब्यात असणारा ट्रक पळवून नेला. या प्रकरणी दहा जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेडगाव येथे अवैध वाळूउपसा अन् वाहतूक सुरू असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यांना मिळाली होती. वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे, महसूल कर्मचारी श्रीकांत गोरे, मंगेश कदम यांचे पथक रविवारी सकाळी पेडगाव येथे गेले होते.

पथकाला पेडगाव येथे एक पांढऱ्या रंगाचा ट्रक (एम. एच. १२ एच. डी. १०१२) उभा असलेला दिसला. त्यामध्ये अवैधरित्या उपसा केलेली वाळू असल्याचे दिसून आल्याने अधिक चौकशी केली असता ट्रकमधील आसिफ शमसुद्दीन तांडेल (रा. पेडगाव) याने हा आपला ट्रक असल्याचे सांगितले.

ट्रकमध्ये अवैधरित्या उपसा केलेली चार ब्रास वाळू असल्याने ही ट्रक कारवाईकामी श्रीगोंदा येथे घेऊन जाण्याच्या सूचना पथकाने संबंधितास दिली. मात्र तांडेल याने आपल्या सहकाऱ्यांना फोन करून पेडगाव चौक येथे बोलावून घेतले.

आरोपी तांडेल याच्यासह नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने ट्रकमध्ये बसलेल्या महसूल कर्मचारी गोरे व कदम यांना बळाचा वापर करून खाली खेचले आणि ट्रक पळवून नेला. महसूल पथकाने काही अंतर ट्रक व टाटा नेक्सोन कंपनीच्या गाडीपाठलाग केला काही अंतर गेल्यावर आरोपीनी नेक्सोन गाडी रस्त्यावर सोडून पळ काढला.

मात्र वाळूने भरलेला ट्रक मात्र पथकाच्या हाती लागला नाही. महसूल पथकाने टाटा नेक्सोन ही गाडी ताब्यात घेत श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिली. याप्रकरणी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या फिर्यादीवरून आसिफ तांडेल याच्यासह इतर नऊ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe