Ahmednagar News : ना रास्तारोको.. ना गाव बंद ! अहमदनगर जिल्ह्यातील हे उपोषण चर्चेत

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राज्यात मराठा आरक्षणाची धार वाढत आहे. यासाठी विविध आंदोलने, दगडफेक व जाळपोळ सुद्धा झाली आहे. मात्र कोल्हार भगवतीपूर मध्ये ‘ना रस्ता रोको, ना गांव बंद!, असे उपोषण काल सोमवारी चौथ्या दिवशी सुटले.

मात्र आपल्या न्याय हक्कांसाठी सुरु असलेल्या राज्यातील सर्वच समाजातील जनतेने आंदोलन कसे असावे, याचा आदर्श पायंडा या निमित्ताने कोल्हार भगवतीपूर येथील मराठा समाजाने नक्कीच घालून दिला आहे.

या उपोषणास जितेंद्र खर्डे, सुरेश पानसरे, किरण राऊत, अमोल खर्डे, अभय एन खर्डे, नितीन डी. खर्डे, सोमनाथ खर्डे, संकेत कापसे आदींनी लिंबू पाणी घेत आपले उपोषण सोडले. मात्र अनेक वर्षांपासून सकल मराठा समाजाने सुमारे ५८ मोर्चे काढले.

या सर्व मोर्चात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक नुकसान या मोच्यांने केले नाही. मात्र जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झाल्यावर सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

कुठल्याही समाजाचे आंदोलन झाले की, वाहनांची अन त्यात एसटी बसची जाळपोळ ठरलेली. ज्या एसटी करिता तासंतास वाट पाहतो, त्याच एसटीवर आंदोलनात पहिला दगड पडतो. यात देशाचे व राज्याचेही नुकसान होते. याचे भान सर्वच समाजातील आंदोलकांनी ठेवायला हवे.

सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व ५८ मोर्चे शांततेत पार पडले. मात्र यावेळी जालना जिल्ह्यातील आंतरावली सराटी येथे दगडफेक व वाहनांची जाळपोळ होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. सदर जाळपोळ व दगडफेक कोणी केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस प्रशासन त्यावर योग्य ते पाऊल उचलेल.

या सर्व घडामोडी पहाता कोल्हार भगवतीपूर येथे उपोषणास बसलेल्या युवकांनी अथवा इतर ग्रामस्थांनी ‘ना गांव बंद’ पुकारला ना ‘रस्ता रोको’ केला. समाजातील कुठल्याही घटकास त्रास होईल, असे कुठलेही कृत्य मराठा समाजातील येथील बांधवांनी केले नाही.

कुणासही वेठीस न धरता आपल्या न्याय्य हक्कासाठी शांततेने आमरण उपोषण करीत सरकारचे लक्ष वेधले आहे. कोल्हार भगवतपूरकरांचा हाच आदर्श सर्व समाजातील आंदोलकांनी घेतल्यास नक्कीच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टळून पोलीसांचाही ताण नक्कीच कमी होईल अन मराठा समाजाचा अनुकरणीय आदर्श राज्यभर जाईल.

विखे पाटलांची विनंती अन् अधिकाऱ्यांची मध्यस्थी !

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने प्रांताधिकारी माणिकराव आहेर, राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे, लोणीचे सपोनि युवराज आठरे यांच्या मध्यस्तीने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते जितेंद्र खर्डे व इतर सात जणांनी राधाकृष्ण विखे पाटील व सर्व शासकीय अधिकारी यांच्या शब्दाचा मान राखुन चौथ्या दिवशी आमरण उपोषण सोडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe