बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट ! शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

Maharashtra News : पावसाळा संपत आला तरी जोरदार पाऊस पडलेला नाही. बैलपोळा सणानिमित्त बाजारपेठा सजल्या असल्या तरी दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट दिसत आहे. तरी देखील आज सर्जा राजाचे घरोघरी पुजन करून त्यांना गोडधोड खाऊ घातले जाणार आहे.

यंदा सुपा परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे खरीपाला जीवदान मिळाले असले तरी हा पाऊस सर्वत्र नव्हता. त्यानंतर आता पुन्हा उन पडले आहे.

शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या बैलपोळा सणावर त्याचा परिणाम जाणवत आहे. मात्र अशा परिस्थितीतही बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा पोळा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ग्रामीण भागात प्राचीन परंपरा जोपासणारा अस्सल मराठमोळा पोळा सण श्रावण अमावस्या अथवा पिठोरी अमावस्येला दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या महिना भरापासून पाऊस गायब झाला आहे. तीन-चार दिवसांपूर्वी काही भागात तो पडला असला तरी त्यामुळे पाणी साठवण झालेली नाही.

त्यामुळे हा पाऊस दुष्काळ हटविण्यासाठी पुरेसा नाही. या वर्षी दुष्काळाचे सावट असल्याने वस्तु खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत नाही. आठवडे बाजारात शेतकरी पोळ्याचे साहित्य खरेदी करत असतात परंतु यंदा खरेदीसाठी उत्साह दिसत नाही.

गेल्या काही वर्षांपासून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जात असल्याने बैलजोडी घरासमोर ठेवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बैलांच्या साज खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने बाजारपेठेत सध्या शुकशुकाट असून पाणीटंचाई असल्याने बैलांना धुण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नाही.

प्यायलाच पाणी नाही तर जनावरांना आंघोळ कशी घालणार असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. ओढे, नद्या, नाले, पाझर तलाव, विंधन विहीरी पाण्यावाचून कोरडेठाक पडल्याने शेतकरी पुरता हतबल झाला असून बैलपोळा सणावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे.