पुण्याहून मनमाडला जाणाऱ्या बसने रात्री अडीच वाजता घेतला पेट ! आणि नंतर…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : पुणे येथून मनमाडला जाणारी एसटी बसच्या मागील टायरने मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला होता. काही क्षणातच गाडीला आग लागल्याचे चालकाच्या अन् वाहकाचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरवले, अन्यथा मोठी दुर्दैवी घटना घटली असती.

दरम्यान, आग लागल्याची घटना समजताच राहाता नगरपालिकेचे अग्निशामक विभाग प्रमुख अशोक साठे हे आपल्या अग्निशामक पथकासह रात्री अडीच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले व काही क्षणात आग आटोक्यात आणली. वाहन चालक वाहक व प्रवासी या सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या याबाबत माहितीनुसार, पुणे – मनमाड ही लालपरी बस पुण्याहून मनमाडकडे जात असताना नगर- कोपरगाव राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी निर्मळ हद्दीतील हॉटेल विश्वदीप जवळ या गाडीचे मागील टायरला मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास आग लागली होती.

टायरने जोरदार पेट घेतला, आगीच्या ज्वाला निघत होत्या. दरम्यान, बस मधील अनेक प्रवासी हे साखर झोपेत होते. आग लागल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवून तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

ही घटना दूरध्वनीवरून राहाता नगरपालिकेचे अग्निशामन विभाग प्रमुख अशोक साठे व त्यांच्या सहकाऱ्यांना समजली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीच्यावेळी अग्निशामक घेऊन आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व तातडीने टायरमुळे पेट घेतलेल्या बसची आग आटोक्यात आणली.

त्यामुळे बस वाचलीच परंतु होणारी मोठी दुर्घटना देखील टळली. एवढ्यावरच न थांबता साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाल परीचे चालक व वाहक यांच्या मदतीने मध्यरात्रीच्या वेळी सर्व प्रवाशांना धीर देत, या प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसून पुढील प्रवासासाठी त्यांची वाटचाल करून दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe