India News : देशातील जवळपास ४० टक्के विद्यमान खासदार कलंकित असून त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले सुरू आहेत. यापैकी २५ टक्के खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलाविरोधी अपराध केल्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे मंगळवारी समोर आले आहे.
लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येक खासदाराच्या संपत्तीचे सरासरी मूल्य ३८.३३ कोटी आहे. सुमारे ५३ खासदार (७ टक्के) अब्जाधीश असल्याची माहिती मंगळवारी उजेडात आली आहे.
देशातील निवडणूक अधिकार संस्था ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ने (एनईडब्ल्यू) लोकसभा व राज्यसभेतील ७७६ पैकी ७६३ विद्यमान खासदारांच्या स्व- शपथपत्राचे विश्लेषण केले.
यात म्हटले आहे की, ७६३ पैकी ३०६ म्हणजेच ४० टक्के विद्यमान खासदारांनी आपल्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचा खुलासा केला आहे. तर १९४ अर्थात २५ टक्के विद्यमान खासदारांनी स्वतःविरोधातील गंभीर गुन्ह्यांची वाच्यता केली.
यात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, महिलाविरोधी गुन्हे आदींचा समावेश आहे. केरळातील २९ पैकी २३, बिहारमधील ५६ पैकी ४१, महाराष्ट्रातील ६५ पैकी ३७, तेलंगणातील २४ पैकी १३, दिल्लीचे १० पैकी ५ खासदार कलंकित आहेत.
याबाबत त्यांनी निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. भाजपचे ३८५ पैकी १३९, काँग्रेसचे ८१ पैकी ४३, तृणमूलचे ३६ पैकी १४, राजदचे ६ पैकी ५, माकपचे ८ पैकी ६, आपचे ११ पैकी ३, वायएसआर काँग्रेसचे ३१ पैकी १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ पैकी ३ खासदारांनी स्वतः विरुद्ध गुन्हे दाखल असल्याची कबुली दिल्याचे एडीआरने सांगितले.
दरम्यान, संसदेतील ११ खासदारांविरुद्ध हत्या, ३२ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि २१ खासदारांविरुद्ध महिलाविरोधी गुन्हे दाखल असल्याचे एडीआरने सांगितले. लक्षद्वीपच्या एकमेव खासदाराची संपत्ती अवघी ९.३८ लाख रुपये आहे. त्यापाठोपाठ त्रिपुरा व मणिपूरमधील प्रत्येकी ३ खासदार अवघ्या १ कोटीच्या संपत्तीचे धनी असल्याचेही एडीआरच्या सूत्रांनी सांगितले.