Maharashtra Politics : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर…खा. सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं !

Ahilyanagarlive24 office
Updated:

Maharashtra Politics : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रम याचा मंत्रिमंडळ विस्तारावर परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.

या सर्व बाबींमुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आता गणेशोत्सवानंतरच होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिले आहेत.

गणेशोत्सवापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे खा. सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते, परंतु आता या व्यस्त कार्यक्रमांमुळे गणेशोत्सवानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे खा. तटकरे यांनी स्पष्ट केले.

मोदी लाट असतानाही आपण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलो. रायगड लोकसभा मतदारसंघातून कुणी उभे रहायचे हे अद्याप ठरलेले नाही. माझ्यावर सध्या राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे कोण उमेदवार द्यायचा याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील, असे खा. तटकरे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भाजपप्रणित महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर काही लोक विशिष्ट समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत.

ज्यांच्या मनात खरच संभ्रम असेल तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. असे असले तरी आमचे लाखांचे मेळावे होत आहेत, याचा अर्थ लोक आमच्या सोबत आहेत, हे स्पष्ट आहे.

आघाडीच्या राजकारणात अपरिहार्यता असते नेमकी हीच परिस्थिती असली तरी आम्ही आमचा सर्वधर्म समभाव आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही, याचा तटकरे यांनी पुनरुच्चार केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe