Maharashtra News : मुंबई महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात नियमाचे काटेकोर पालन करणाऱ्या मंडळांना शंभर रुपयांत एकदम पाच वर्षांकरता परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गणेशोत्सव मंडळांना यामुळे दिलासा मिळणार असून जागेसाठी दरवर्षी घ्याव्या लागणाऱ्या परवानगीची फरफटही थांबणार आहे.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुढील पाच वर्षांकरता एकदाच परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मागणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पाच वर्षांकरता एकदाच परवानगी देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. त्यानुसार नगर विकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यावर्षीच्या १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांना करावी लागणार आहे.
तसेच मागील दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना याचा फायदा होणार आहे. एकदम परवानगी मिळाल्याने आगामी वर्षांसाठी मंडळांना आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देताना नाममात्र असे शंभर रुपये भाडे घेतले जाईल.
उत्सवाकरता यापूर्वी वेळोवेळी विहित केलेला शासन निर्णय, आदेशानुसार अटी-शर्तीचे मंडळांना पालन करावे लागणार आहे. मंडळांना स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.