Maharashtra News : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना १५ दिवसांकरिता टोल माफी (पथकर सवलत) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून ही टोलमाफी १ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशभक्तांना टोल द्यावा लागणार नाही.
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून त्यासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो भाविक गावी जातात. त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफी जाहीर करून पासेस उपलब्ध करून दिले होते.
यंदाच्या वर्षीही टोलमाफी कधी जाहीर होते, याकडे गणेशभक्तांचे लक्ष होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार यंदाच्या वर्षीही टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला असून तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
तसेच हे पासेस परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत, तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडून पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.