MSRTC News : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशी आपल्या नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या काळात त्यांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. त्याचे प्रवास भाडे अधिक असल्याने अनेकांना ते परवडत नाही. तसेच काही मार्गावर इतर प्राधिकरणाच्या बससेवाही सुरू नाहीत.
परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ती टाळण्यासाठी अशा मार्गांचा शोध घेऊन तिथे अधिकच्या बस सोडण्याचा टीएमटी प्रयोग करणार आहे. यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी हा प्रयोग करण्यात आला. त्याला यशही मिळाले असून, या दिवशी टीएमटीच्या तिजोरीत चांगले उत्पन्न जमा झाले होते.
आजच्या घडीला ठाणे महापालिका हद्दीत सध्या बेस्ट, वसई-विरार महापालिका, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई महापालिका, त्याच जोडीला राज्य परिवहन सेवेच्या बसेस धावत आहेत. यातील प्रत्येक उपक्रमांच्या बसचे तिकीट दर कमी अधिक आहेत. यात बेस्ट प्रवासी उपक्रमास मुंबई महापालिकेकडून टाटा कंपनीच्या शंभर मार्कोपोलो नवीन मिनी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या प्राधिकरणांना टक्कर देण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता एक वेगळा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या मार्गावर इतर प्राधिकरणाच्या बसेस धावत नाहीत. त्या मार्गावर आपल्या बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आता यश मिळताना दिसत आहे.
सुट्टीच्या दिवशी अथवा रविवारी जिथे टीएमटीचे उत्पन्न कमी असते. तिथे अधिकच्या बस चालवण्यात आल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ३० ऑगस्टला ठाणे परिवहन सेवेने अधिकच्या बस रस्त्यावर उतरवल्या होत्या.
या सर्व उपाययोजनांचा परिणाम दिसून आला आहे. ३० ऑगस्टला सुट्टी असूनही टीएमटीच्या तिजोरीत अधिकचे उत्पन्न जमा झाले आहे. आता हाच प्रयोग गणेशोत्सवाच्या काळातही केला जाणार आहे. त्यात आता इलेक्ट्रिक बसही उपलब्ध झाल्या आहेत.
सणासुधीच्या काळात प्रवाशी नातेवाईक किंवा इतर ठिकाणी जाण्याकरता बाहेर पडतात. अशा प्रकारे बस जर या काळात चालवल्या गेल्यास त्याने प्रवाशांची मोठी व्यवस्था होईल. या बस कळवा ते मुलुंड, कळवा ते नवी मुंबई, ठाणे ते बोरिवली, दिवा तसेच अंतर्गत भाग असलेल्या उपवन, पवारनगर, मनोरमा नगर, बाळकुम घोडबंदर, हावरे सिटी या मार्गावर अधिकच्या बस चालवल्या जातील.
■ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचा देखील समावेश असेल. याबाबत ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रक्षाबंधनाच्या निमित्ताने नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा, टीएमटीच उत्पन्नही वाढावं याकरिता आम्ही विविध लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस चालवण्याचा निर्णय घेतला..
■हा निर्णय यशस्वीही झाला. जिथे सुट्टीच्या दिवसाला उत्पन्न मर्यादित होते, तिथे उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले. परिणामी, आता आम्ही हा प्रयोग गणेशोत्सवाच्या काळातही करणार आहोत, असे जोशी यांनी सांगितले.