Pune Crime News : उसन्या पैशाच्या वादातून दोघा मित्रांनी दारूच्या नशेत पीएमपी चालकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १६) पहाटे उघडकीस आला. यासंदर्भात, दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) हे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार ( वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे.
दिवेकर, कुंभार व पाटेकर शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्री दारू पीत बसले होते, त्या वेळी त्यांच्यात उसने दिलेल्या पैशावरून वाद झाला. त्यात दोघांनी धारदार शस्त्राने वार करून दिवेकर यांचा खून केला.
पती रात्रभर घरी न आल्याने त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती. त्या वेळी त्यांना दिवेकर यांचा खून झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी वेगवान तपास करत दोघांना अटक केली.