Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे शनिवार दि.१६ रोजी पहाटे बिबट्याकडून वासराची शिकार करण्यात आली आहे. येथील वाकी वस्ती परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी परिसरातील वाकी वस्ती येथे गेल्या आठवड्यात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. दीपक दारकुंडे यांनी बिबट्या पाहिल्यानंतर ग्रामस्थांना माहिती दिली होती.
मादी बिबट्या व त्याची दोन पिल्ले असल्याचे नागरिकांनी सांगितले. शनिवारी सुशील माधवराव मगर यांच्या वासराची शिकार करण्यात आली. वन विभागाचे वनपाल शरमाळे, वनरक्षक रणसिंग यांनी मृत वासराचा पंचनामा केला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी वासराचे शवविच्छेदन केले. वन विभागाकडून परिसरात बिबट्याचा वावर असून वासराची शिकार ही बिबट्याकडूनच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाकी वस्ती येथील काटवण इनाम परिसरात बिबट्याचा वावर आढळून येत आहे.
बहिरवाडी येथील पै. जगन्नाथ दारकुंडे यांच्या कुत्र्याची शिकार देखील बिबट्याकडून करण्यात आली आहे. बहिरवाडी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.
घटनास्थळी शिवाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य राजू दारकुंडे, बहिरु दारकुंडे, संजय येवले, गणेश दारकुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली व परिसरातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले.