Ajab Gajab News : अमेरिकेतील एका संस्थेने जगभरातील लठ्ठ लोकांबाबत एक रंजक असा सर्वेक्षण अहवाल नुकताच जारी केला आहे, ज्यामध्ये १९५ देशांचा समावेश असून लठ्ठपणाच्या आधारावर या देशांची एक सूची जारी करण्यात आली आहे. या सूचीमध्ये असे काही देश आहेत की, ज्यांना जड्या किंवा लठ्ठ लोकांचे देश असे म्हणता येऊ शकेल.
‘अवर वर्ल्ड इन डेटा’ असे या संस्थेचे नाव आहे. या संस्थेने लठ्ठपणाच्या आधारावर देशांची जी यादी तयार केली आहे, त्यामध्ये अव्वल स्थानी नॉरू नावाचा देश आहे. हा देश प्रशांत महासागरामध्ये वसलेला आहे.

हे एक बेट असून, त्याला सुखी माणसांचे बेट असे म्हटले जाते; कारण येथील बहुतांश लोक अत्यंत आरामाचे जीवन जगतात. या देशातील प्रति दहा माणसांतील नऊ माणसे लठ्ठ आहेत. येथील लोकांचे सरासरी वजन शंभर किलो आहे.
लठ्ठ देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे पलाऊ हा देश. हेदेखील एक बेटच आहे. काही वर्षांपूर्वी या देशाच्या सरकारने भारतातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थानापासून प्रेरणा घेऊन भगवान व्यंकटेश्वराची छबी असलेली नाणी जारी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा हा देश चर्चेत आला होता. या देशातील सुमारे ८५ टक्के नागरिक लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत.
यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे कुक आयलंडस्. हेदेखील प्रशांत महासागरातील एक बेट आहे. चारीबाजूंनी समुद्राने वेढलेला हा देश नितांत सुंदर आहे. त्यामुळे पर्यटन हाच या देशाचा मुख्य व्यवसाय आहे.या देशातील लठ्ठ माणसांचे प्रमाण सरासरी ८३ टक्के आहे.