शेतकऱ्यांचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राचा विकास साध्य करण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. बऱ्याच योजनांच्या माध्यमातून शेतीसंबंधीत अनेक कामे पूर्ण करण्याकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे करणे सुलभ व्हावीत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा हेतू आहे.
या अनुषंगाने जर आपण केंद्र सरकारचा विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवल्या जातात. मात्र केंद्र सरकारच्या आत्तापर्यंतच्या सर्व योजनांपैकी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सगळ्यात यशस्वी योजना म्हणून ओळखली जाते. आपल्याला माहित आहेस की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यात विभागून करण्यात येते.

याच योजनेच्या धर्तीवर महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा केलेली होती. या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन टप्प्यात विभागून सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. परंतु जर आपण या योजनेची सद्यस्थिती पाहिली तर अजून पर्यंत या योजनेचा एकही हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नेमकी काय कारणे यामागे आहेत? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
कधी मिळेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता?
या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे व या योजनेची कार्यवाही करिता महा आयटी ने सॉफ्टवेअर तयार केले परंतु अंतिम चाचणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजारांचा पहिला हप्ता जमा होऊ शकलेला नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येतात.
अगदी त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या नमो किसान योजना देखील त्याच पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या पी एम किसान योजनेचे निकष आणि माहिती या नमो किसान निधी योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. परंतु सध्याची स्थिती पाहिली तर पी एम किसान ची लाभार्थी संख्या अजून देखील निश्चित होत नसल्याने राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकलेला नाही.
यामध्ये पहिला हप्ता एप्रिल ते जुलै तसेच दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर व तिसरा डिसेंबर ते मार्च या दरम्यान देणे गरजेचे होते. आतापर्यंतचा विचार केला तर या योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असते परंतु आतापर्यंत ते मिळालेले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की या योजनेचा हप्ता कधी मिळेल ते?