Ahmednagar News : न्यायालयात वाद सुरू असताना जमिनीची खरेदी करून त्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवत मारहाण करत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कांचनमाला परसराम कांडेकर यांच्या फिर्यादीवरून माजी नगरसेवक एन. के. कोथिंबिरे यांच्यासह अन्य चार जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसारः फिर्यादी कांडेकर यांची वडाळी शिवारात शेती आहे. सदरची शेतजमीन पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा येथील अतुल राजेंद्र कोठारी यांनी राहुल अविनाश देशमुख यांच्याकडून विकत घेतली आहे.
त्या शेतीसंबंधी न्यायालयात खटला सुरू असल्याने त्यावर फिर्यादी यांचाच ताबा आहे. मंगळवार, दि. १९ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वडाळी येथील शेतात अतुल कोठारी, राजेंद्र कोठारी दोघे रा. पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा, सुकली (पूर्ण नाव माहीत नाही), आप्पा सोनवणे, माजी नगरसेवक एन. के कोथिंबिरे रा. श्रीगोंदा व इतर अनोळखी सदर शेतीची कायदेशीर मोजणी न करता गैरकायद्याची मंडळी जमवून शेतात मशागतीसाठी आले,
या वेळी फिर्यादी व कुटुंबीय तेथे गेले असता फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला दमबाजी केली. यातील सुकली हिने शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करीत मी जमीन विकत घेतली आहे, वावरात आली तर पाय तोडील, तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली.
तर आप्पा सोनवणे व एन.के. कोथिंबिरे यांनी आम्ही अशाच अडचणीच्या जमिनी विकत घेतो, पोलीस ठाणे, मंत्रालय आम्हाला सगळे माहिती आहे. तुम्ही जमिनीत आलात तर महागात पडेल, अशी दमबाजी केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.