मोदी सरकारने गॅस सिलिंडर स्वस्त केला पण नुकसान झाले वितरकांचे !

Gas cylinder

Gas cylinder : केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याचा मोठा फटका गॅस वितरकांना बसला आहे. देशभरातील २६ हजार वितरकांना सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. भरपाई देण्याची मागणी एलपीजी वितरक महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनादिवशी गृहिणींना दिलासा देणारी घोषणा केली. त्यानुसार १४.२ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या गॅसच्या सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या.

या मुळे सिलेंडर फार स्वस्त झाला नसला, तरी २०० रुपयांचा दिलासा मात्र मिळाला, या निर्णयाची अंमलबजावणी ३० ऑगस्टपासून सुरू झाली. गॅस कंपन्यांनी २९ ऑगस्टपासूनच सिलेंडरचा मोठा साठा वितरकांकडे पाठवून दिला होता.

वास्तविक वितरकांनी आगाऊ पैसे भरून मागणी नोंदविल्याशिवाय कंपन्यांकडून सिलिंडर भरून गाड्या पाठविल्या जात नाहीत. पण, पंतप्रधानांनी दर कमी करण्याची घोषणा करताच कंपन्यांनी भरभरून गाड्या पाठवल्या.

त्याची बिले परस्पर वितरकांना धाडली. याशिवाय वितरकांकडे पूर्वीच आलेला साठाही शिल्लक होता. याचा एकूणच आर्थिक भार त्यांच्यावर पडला. प्रत्येक वितरकाचे सरासरी लाखभर रुपयांचे नुकसान झाले.

त्यामुळे महासंघाने आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. महासंघाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात पंतप्रधानांनी महिलांना रक्षाबंधनाची दिलेली भेट स्वागतार्ह आहे; पण त्याचा असह्य बोजा वितरकांवर पडला आहे.

प्रत्येक सिलेंडरमागे २०० रुपये दर कपात केल्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे, त्याच धर्तीवर वितरकांच्या नुकसानीची जबाबदारीही तेल उत्पादक कंपन्यांनी घ्यावी व भरपाईचे पैसे द्यावेत, अशी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe