Big News : फटाक्यांच्या लड आणि बेरियमयुक्त फटाक्यांची निर्मिती व विक्रीसाठी परवानगी मागणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पारंपरिक फटाक्यांसंदर्भात जारी करण्यात आलेल्या २०१८ च्या निर्बंध व निर्देशांचा न्यायालयाने यावेळी पुनरुच्चार केला.
न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने लड आणि बेरियमयुक्त फटाक्यांच्या निर्मिती व विक्रीसाठी परवानगी देण्यास नकार दिला. अशी मागणी करणाऱ्या दोन्ही याचिका आम्ही फेटाळून लावत आहोत.
त्याचबरोबर २०१८ च्या निर्देशांमध्ये हस्तक्षेप केला नाही तर त्याचा पुनरुच्चार आम्ही केला असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. सोबतच संबंधित प्राधिकरणाला नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
न्यायालयाने १४ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि साठवणुकीसाठी तात्पुरते परवाने न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेरियमयुक्त फटाक्यांवर निर्बंध घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता.
जर दिल्ली सरकारने सर्व फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत तर त्यांच्या हरित असणे न नसण्याच्या आधारावर त्यात भेद करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये पारंपरिक फटाक्यांवर निर्बंध घालत फक्त हरित फटाक्यांना परवानगी दिली होती.