Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरनजीक असलेल्या एकलहरे शिवारातील बॅटरी व्यावसायिकाच्या बंगल्यावर दरोडा पडला नसून पत्नीनेच पती नईम पठाण याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पती अनैसर्गिक संबंधासाठी छळत असल्याने पत्नीने झोपेच्या गोळ्या देवून साडीने गळा आवळत पतीचा खून केल्याची कबुली दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, गुरूवार दि. २१ रोजी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून पतीचा खून करत पत्नी बुशरा हिला गंभीर मारहाण केली होती. बंगल्यातील सात लाख रुपये व दागिने घेवून दरोडेखोर पळून गेले, अशी तक्रार बुशरा हिने पोलिसात दिली होती.
त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. पत्नी बुशरा हिच्याकडे पोलीसांनी सखोल तपास केला असता तिने प्रत्येक वेळी वेगवेगळी हकीकत सांगितली. पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. पती नईम हा गेल्या पाच ते सात वर्षांपासून अनैसर्गिक संबंधासाठी छळत होता. या रागातून गुरूवारी रात्री दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून ते दूध नईमला पिण्यास दिले.
त्याला गुंगी आल्यावर साडीचे एक टोक खिडकीच्या गजास बांधून साडी त्याच्या गळ्याभोवती आवळून त्याला जीवे मारले. बंगल्यातून कोणत्याही प्रकारे पैसे अगर दागिने चोरी गेले नाही, अशी कबुली बुशरा हिने दिली.
त्यावरून पोलीसांनी तत्काळ तिला अटक केली. ही घटना उघडकीस आल्यावर प्रथमदर्शी दरोडा पडल्याचे वाटत असल्याने एकलहरे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. आरोपींना पकडल्याशिवाय नईमचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु, पोलीसांनी तत्काळ तपास करण्याचे आश्वासन दिल्यावर नईमवर अंत्यविधी करण्यात आला. तपासाचा प्रचंड दबाव असतानाहीदेखील श्रीरामपूर पोलीसांनी अवघ्या काही तासात दरोड्याचा बनाव उघडा पाडत पतीचा खून करणाऱ्या पत्नी बुशराला गजाआड केले, यामुळे श्रीरामपूर पोलीसांच्या कामगिरीचे नागरिकांनी स्वागत केले आहे.