Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र समजले जाते. दरवर्षी भंडारदरा पर्यटनासाठी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या प्रमुख शहरातुन तसेच राज्यासह परराज्यातुनही अनेक पर्यटक भंडारदऱ्याला भेट देत असतात.
भंडारदऱ्याचा खरा निसर्ग हा धरणाच्या पाठीमागील बाजुला रिंगरोडला दडलेला आहे. या रिंगरोडवर वसुंधरा फॉल, कोलटेंभे धबधबा, सांदनदरी या प्रमुख पर्यटन स्थळासह इतरही आकर्षक ठिकाणे पर्यटकांना खुणावत असतात.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण तसेच धरणाच्या परिसरात दडलेला निसर्ग बघण्यासाठी पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र येथील खड्डेमय रिंगरोड पर्यटकांसाठी मोठा अडथळा ठरत असून चांगला वाटणारा भंडारदरा बघितल्यानंतरही पर्यटक खड्डेमय रस्त्यामुळे संताप व्यक्त करीत आहेत.
तसेच भंडारदरा धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या रिंगरोडची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पर्यटन प्रेमींबरोबरच परिसरातील स्थानिक नागरीक करीत आहेत.
रिंगरोडवर असणाऱ्या ठिकाणांना बघण्यासाठी पर्यटकांना सगळ्यात मोठा अडथळा रस्त्याचा ठरला आहे. या मार्गावर रस्त्यावर मोठमोठे गुडघ्या इतके खड्डे पडलेले आहे. खड्ड्यातच पावसाचे पाणी साठवुन राहत असल्यामुळे खड्डाच वाहन चालकाला समजत नाही व सदर वाहन त्याच खड्ड्यात बंद पडते.
वाहन चालवताना वाहन चालकाला नक्की कोणता खड्डा चुकवावा हा मोठा प्रश्न पडतो. एक खड्डा चुकवला की दुसरा खड्डा तोंड वासुन पुढे उभा असतो. हा रस्ता चुकवताना अनेक वेळेस अपघात होण्याची शक्यता असते.
दुचाकी स्वारांनाही गाडी चालवताना रस्त्याच्या कोणत्या बाजुने गाडी चालवावी हा प्रश्न पडतो. भंडारदरा धरणाच्या वनविभागाचा टोलनाका सोडल्यानंतर रस्त्याची परवड सुरु झाली असून रतनवाडीपर्यंत हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे.
या रस्त्यावर असणारे डांबरच गायब झाल्याने कमीत कमी रस्त्याची मुरुम टाकुन का होईना, परंतु डागडुजी करावी, अशी अपेक्षा या रोडवर असणाऱ्या गावातील आदिवासी बांधव करीत आहे.
नान्ही फॉल पासून अमृतेश्वर मंदिरापर्यंत हा नक्की रस्ताच आहे का? असा प्रश्न रतनवाडीच्या नागरीकांना पडला असून चारचाकी वाहने व दुचाकीस्वारांना कासव गतीने आपली वाहने चालवावी लागत आहे.
या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते मात्र याकडे सोईस्करपणे डोळेझाक करत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. रिंगरोडवर निसर्गाचे देखणे रुप पाहुन झाल्यानंतर पर्यटकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. फक्त या परिसरातील रोड चांगले करा. तरच भंडारदयाला सुगीचे दिवस येतील, असे पर्यटक सांगत आहेत.