Ahmadnagar Breaking : संगमनेर खुर्द येथील खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. या खुनात वापरलेला कोयताही पोलिसांनी नुकताच जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर खुर्द परिसरात (दि.१५) सप्टेंबर रोजी एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली होती.
संगमनेर खुर्द शिवारातील रमेश सुपेकर यांच्या शेतालगतच्या प्रवरा नदीच्या पात्रात एक प्रेत पालथ्या अवस्थेत तरंगताना दिसून आले होते. प्रेतालगत नदी काठावर रक्ताचे थारोळे साचले होते. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, हा मतदेह मारुती आवा डामसे (वय ४२. रा. संगमनेर खुर्द) याचा असल्याचे स्पष्ट झाले होते.

चारचार हत्याराने त्याचा गळा कापलेला होता. सदरचा खून हा त्याची पत्नी दिपाली मारुती डामसे हिने तिच्या साथीदारांना सोबत घेऊन केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. याबाबत पांडुरंग डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. तपासासाठी तीन पोलीस पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी मयताची पत्नी दिपाली मारुती डामसे हिला ताब्यात घेवून माहिती घेतली असता, तिने सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली.
मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने कबुली दिली. पोलिसांनी या खून प्रकरणी रमेश तुकाराम भले (वय ३६, रा. येणेरे, ता. जुन्नर), गणेश बाळशीराम भालेकर (वय ३५, रा. काटेडे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना ताब्यात घेवून विचारपुस केली.
तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले हत्याराबाबत विचारपुस केली असता, रमेश तुकाराम भले याने त्याच्याकडील लोंखडी कोयत्याने मयतास मारुन खून करून तो चंदनापुरी घाटात फेकुन दिल्याचे सांगितले.