Ahmednagar News : आम्ही गणेश कारखान्याच्या मदतीला आलो. मालक व्हायला नाही. सभासद बांधवांनो काळजी करू नका. गणेश चालविण्यासाठी प्रामणिक प्रयत्न करू. तुमची भक्कम साथ असू द्या. असे प्रतिपाद राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
आमदार बाळासाहेब थोरात व संजिवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी गणेश सहकारी साखर कारखान्याची ६२वी वार्षिक सभा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले. या व्यतिरिक्त तत्कालीन संचालक मंडळाच्या काळातील सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्या कारभाराची कायदेशीर चौकशी करण्याचे ठरावही या सभेत मांडण्यात आले.
आमदार थोरात म्हणाले, आम्ही गणेशच्या मदतीला आलो, मालक व्हायला नव्हे. विरोधक खुप अडचणी उभ्या करतात, पण काळजी करु नका, गणेश चालविण्यासाठी प्रामणिक प्रयत्न करु.विरोधकांनी ८ वर्ष कारखाना चालविला, फायदा काय?
तुमच्यावर बोजा करून ठेवला. गणेशचा ऊस प्रवरेला कसा नेता येईल, हे पाहिले जाते. गोदावरी कालव्याचे रुंदीकरण का केले नाही. वर्गणी करुनही काम रखडले ? असा सवालही आमदार थोरात यांनी ना. विखे यांचे नाव न घेता उपस्थित केला.
विवेक कोल्हे म्हणाले, स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गणेश उर्जितावस्थेत आला होता. आताही कोल्हे थोरात यांच्याकडे आला आहे.गोदावरी दूध संघापासुन आडवा आणि जिरवा मोहिम त्यांनी सुरु केली आहे.
ते सरकारमध्ये असताने जिल्ह्यात फक्त गणेशला थकहमी दिली नव्हती. करारानंतर गणेश ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कारखाना कर्ज मुक्त करण्याऐवजी कर्ज करून ठेवले. कोल्हे थोरात यांची जिरविण्याबरोबर गणेश परिसराची जिरवू नका, अशी टिका त्यांनी केली.
यावेळी सुधीर लहारे यांनी सत्तेचा गैरवापर करून गणेशची अडवणूक करण्यात येत असल्याची टीका केली. मागच्या संचालक मंडळाच्या त्या आठ वर्षातील कारभाराची कायदेशीर चौकशी करण्याचे ठराव करण्यात आला.
वाढीव सहभागीदारी करारास दिलेल्या मंजुरीची मान्यताही रद्द करण्याचा ठरावही या सभेत संमत करण्यात आला.सभासदांनी मांडलेल्या प्रश्नांना अध्यक्ष लहारे, माजी अध्यक्ष अॅड. नारायणराव कालें, अनिल गाढवे, नानासाहेब नळे, संपतराव चौधरी, भगवानराव टिळेकर आदींनी उत्तर दिले. इतिवृत्त वाचन प्र. कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी केले. आभार संचालक महेंद्र गोर्डे यांनी मानले.