Ahmadnagar Breaking : प्रकल्पग्रस्तांसाठीच्या तरतुदीनुसार शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जांभळी मोहोळ (ता. पाथर्डी) येथील रहिवासी असलेल्या रणजीत बाबासाहेब आव्हाड या कंत्राटी शिक्षकाने मंत्रालयात जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात त्याला पुढील चौकशीसाठी नेण्यात आले आहे. दरम्यान मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न वारंवार होत असल्याने तेथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रणजीत आव्हाड हे आळंदी येथे एका वारकरी शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मूळ अंबेजोगाई येथील रहिवासी असून, १९७५ मध्ये पाझर तलावासाठी शासनाने त्यांची जमीन संपादित केलेली आहे.
या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्याला अद्यापपर्यंत शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ शासनाकडून आश्वासने दिली जात आहेत.
मात्र, अद्यापपर्यंत कोणालाही नोकरी दिली गेली नाही. त्यामुळे आव्हाड यांनी शासकीय नोकरीत कायम करावे, या मागणीसाठी वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारल्या.
मात्र, कुणीही दखल घेत नसल्याने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश बागुल यांनी दिली. संरक्षक जाळीवर उडी मारल्यानंतर आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.